#भामगिरी / #भांबगिरी / #भामचंद्र #डोंगर
भामगिरी डोंगररांग चाकण पासून २० किमी अंतरावर असून पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.
भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून १० मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो. येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाके आहेत. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. गाभार्याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्या शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळत, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात. गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. या झाडाजवळून एक पायवाट खालच्या बाजूला जाते. थोडासा उजव्या बाजूला गेल्यावर ती वाट डोंगर च्या माथ्यावर जाते .
वरून भीमाशंकर,भंडारा, घोरडेश्वर, नजरेस पडतात
तुकाराम महाराजांनी १५ दिवस भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यान लावले. त्या काळात सर्प, विंचू, वाघ अंगाला झोंबू लागले, पण त्यांनी ध्यान सोडल नाही, आसन मोडल नाही. शेवटी दिव्याच्या ज्योती जवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला. त्याच वर्णन तुकोबांनी अभंगातून केलेल आहे.
पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला !
भेटला निराकार !!
भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली !
वृत्ति स्थिरावली परब्रम्ही !!
निर्वाण जाणोनी आसन घातिले !
ज्ञान आरंभिले देवाजीचे !!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगासी झोंबिले!
पिडू जे लागले सकळीक !!
दिपकी कर्पूर कैसा तो विराला!
त्तैसा देह झाला तुका म्हणे !!
