Tuesday, 16 August 2022

कोळी महादेव जमातीचे मूळ वस्तीस्थान

निजाम कालीन वऱ्हाड/बेरार प्रांतात म्हणजेच वर्तमान अमरावती महसूल विभागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी कोळी महादेव जमात ही जमात प्रामुख्याने आढळते. तसेच सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर, खानदेश,सोलापूर या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमाती असून ते सुद्धा निजामांच्या देशातून आल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ –IMPERIAL GAZETTEER OF INDIA VOL-XV)

कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर स्थलांतर केले यामुळे आदिवासी कोळी महादेव जमात ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आढळून येते. परंतु सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी,कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आढळून येतात.
Sppplemenary  Rule 8-  In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli.   Do not enter sub-divisions.    Thus you need not enter the kind of Koli or  Bhil such as  Chunvalya Koli or Patelia  Bhil, if the person enumerated states he is a Koli or  Bhil.
वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९  टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे आदिवासी कोळी महादेव,राज कोळी,मल्हार कोळी,टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होते.
वरील ठिकाणी असलेली कोळी महादेव जमात ही  हे पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर येथूनच आलेली आहे. हे खालील संदर्भावरून सिद्ध होते-  पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच महादेव किंवा पचमढी   टेकडी  हे आताच्या मध्य प्रदेश मध्ये आहे-  महादेव किंवा पचमढी   टेकडी  या वरूनच कोळी महादेव या जमातीचे नाव  पडले-  (संदर्भ- The Tribes And castes of the   Central Provinces of India-1916)
महादेव किंवा पचमढी टेकडी या ठिकाणी मोठा महादेव, छोटा महादेव, गुप्त महादेव आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतात आहे. याच भागाला लागून अमरावती जिल्ह्यात  मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर सालबर्डी हे धार्मिक स्थळ महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत. महादेव महाराज देवस्थान आहे.
तसेच अमरावती जिल्ह्याला लागून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.
तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरु आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील  महादेव किंवा पंचमढी  टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी  हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान  आहे.

Tuesday, 9 August 2022

जागतिक आदिवासी दिन


*पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करुन गेला आणि नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली असली, तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी- परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरुन आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते.*

*जगात समाज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास झाला. १९ व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री, समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली. त्याचा परिपाक म्हणून २४ ऑक्टोबर १९४५ या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला.*

*संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील देश ज्यांची एकूण संख्या १९२ इतकी आहे, ते एकत्र आले. सीमांचे प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल ५० वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती.*

*जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली.*

*जागतिक स्तरावर या हालचाली खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामध्ये एकूण २२ भाग, १२ अनुसूची व ३९५ अनुच्छेद आहेत. यामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत. अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मुख्य अनुच्छेदामध्ये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.*

*अनुच्छेद ३६६ मध्ये अनुसूचित जमातीची परिभाषा नमूद केलेली आहे.*

*अनुच्छेद ३४२ मध्ये संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यात राहत असलेल्या अनुसूचित जमातीची यादी घोषित करण्यात आली आहे.*

*अनुच्छेद ३४१ (१)मध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासनासंबंधी व त्याचे नियंत्रण यासंबंधी तरतुदी आहेत.*

*अनुच्छेद २४४ (१) ५ मध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी लागू असलेल्या कायद्यासंबंधी स्पष्ट तरतूदी आहेत. अर्थात भूमि अधिग्रहण व हस्तांतरण, बँकीग व्यवस्था, प्रशासन व्यवस्था इत्यादी प्रशासकीय बाबी गैर आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त आहेत.*

*अनुच्छेद २४४ (१) अंतर्गत ७३ व्या घटना दुरुस्तीद्वारे पाचवी अनुसूची अंतर्गत भारताच्या महामहीम राष्ट्रपतींनी आदिवासींची सांस्कृतिक सामाजिक स्वायत्तता जतन करणारा पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) दिनांक २४ डिसेंबर १९९६ रोजी जारी करुन अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार बहाल केला आहे. शासकीय यंत्रणा, निर्वाचित सदस्य आणि आदिवासी यांच्या सहयोगाने या कायद्याच्या अंमलबजावणीतून आदिवासींच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो.*

*आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजाच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. पेसा कायदा महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांना लागू होतो. पेसा कायद्यांतर्गत सामाजिक हित, रुढी परंपरा, प्रथा व सांस्कृतिक ओळख यांचे जतन व संवर्धन करण्यास, तसेच सामुहिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास आणि आपआपसातील तंटे मिटविण्यास ग्रामसभा सक्षम आहे. यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात परंतु निम्म्यापेक्षा कमी नाही इतके पंचायत राज संस्थामध्ये लोकप्रतिनिधी पदाचे आरक्षण यामध्ये सरपंच पदाचे आरक्षणसुद्धा अंतर्भूत आहे.*

*जमीन हस्तांतरणावर निर्बंध, भूमी संपादन व पुनर्वसन, कृषी/गौण वन उपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाना, बाजार व्यवस्थापन, गावाचा विकास व आर्थिक व्यवस्थापन, अंमली पदार्थांचे नियमन, इत्यादी तरतूदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत.*

*अनुच्छेद १४ मध्ये समानतेचे अधिकार आदिवासींना दिलेले आहेत. आदिवासींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी यामध्ये विशेष तरतूद आहे. यासाठी अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ लागू करण्यात आलेला आहे.*

*अनुच्छेद १६ (४) अनुसूचित जमातीसाठी शासकीय नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद आहे. अनुच्छेद २३ मध्ये मानवी व्यापार व जबरदस्ती काम करवून घेणे याविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी विशेष तरतूद आहे. अनुच्छेद ३३० मध्ये विधानसभेत व ३३२ मध्ये लोकसभेत अनु.जमातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.*

*आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहूल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करुन हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. राज्यात गडचिरोली, नंदूरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वेकरुन आदिवासी बहूल जिल्हे आहेत. या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतीगृहे उपलब्ध करुन दिली जात आहेत. केवळ इतके करुन होत नाही तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरु झाले आहे.*

*याठिकाणी आदीम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.*

*कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करुन इथं आता विकासवाटेवर वाटचाल सुरु झाली आहे, असेच या दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणता येईल.*